एखादी राजकीय विचारसरणी समजावून घेत असताना तिच्या मूळ प्रेरणास्थानाशी ती किती इमान राखते हे पाहणे गरजेचे आहे. विचारसरणी व सिद्धांत यातील फरकही समजून घेतला पाहिजे. राजकीय विचारसरणी या कोणत्या ना कोणत्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या आधारे किवा राजकीय तत्त्वचितकाच्या चितनातून प्रेरित झालेल्या असल्या, तरी राजकीय विचारप्रणाली म्हणजे त्या राजकीय तत्त्ववेत्त्याचे समग्र तत्त्वज्ञान नव्हे हे प्रथम ध्यानात घ्यावे लागेल. म्हणूनच माक्र्सचे तत्त्वज्ञान आणि साम्यवाद यातील फरक समजून घ्यावाच लागतो. गांधींचे तत्त्वज्ञान आणि सर्वोदय यातील फरक समजून घ्यावाच लागतो. बहुजनवाद आणि फुले-आंबेडकरांचे राजकीय तत्त्वज्ञान यातील फरक ध्यानात घ्यावाच लागतो. साम्यवादाची प्रेरणा ही माक्र्सच्या विचारांची असली व त्याची समाजविश्लेषणाची स्थूल चौकट व परिभाषा माक्र्सची असली, तरी सर्वच 'साम्यवादी व्यवहार' माक्र्सच्या समग्र दर्शनाचा आविष्कार असतो असे नाही. तसेच बहुजन वादाची प्रेरणा फुले-आंबेडकरांचा विचार असला, तरी सर्वच बहुजनवादी फुले-आंबेडकरांचे समग्र तत्त्वज्ञान सांगतात/जगतात असे नव्हे. तसेच सगळेच सर्वोदयवादी मंडळी गांधी तत्त्वज्ञान जगतात असेही नाही. म्हणूनच एखादी राजकीय विचारसरणी समजावून घेत असताना तिच्या परिभाषेवरून तो नुसता समजून घेऊन चालणार नाही, तर तिच्या मूळ प्रेरणास्थानाशी ती किती इमान राखते हेही पाहावे लागते. म्हणूनच विचारसरणीची ओळख करून घेताना हळूहळू माणसाला त्या-त्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडेही वळावे लागते. पण हा झाला पुढचा टप्पा. पहिली बाब म्हणजे राजकीय विचारसरणी व राजकीय तत्त्वज्ञान/सिद्धांत यातील फरक समजला पाहिजे. कोणतीही राजकीय विचारसरणी ही काही श्रद्धा व मूल्ये घेऊन उभी असते व तिच्या दृष्टीने या श्रद्धा व मूल्ये स्वयंसिद्ध असतात. त्यांना प्रश्नांकित करणे म्हणजे त्यांच्याप्रती असलेल्या निष्ठांबद्दल अश्रद्ध किवा संशयग्रस्त होणे होय आणि असा संशय घेणे हीच त्या विचारसरणीशी बेईमानी ठरते. राजकीय विचारसरणी अशा 'बेईमानदारांना' आपला विचारशत्रू मानते. म्हणूनच विशिष्ट राजकीय श्रद्धा व मूल्ये यांचा नि:संदिग्ध, आग्रही व निष्ठावान पुरस्कार करणे हे त्या-त्या विचारसरणीचे प्रमुख उद्दिष्ट असते. भांडवलशाहीवादी मंडळी समाजवाद/साम्यवादाला कडवा विरोध करतात, तर समाजाधिष्ठित समाज, शोषणमुक्त समाजाचे ध्येय स्वीकारलेली समाजवादी/ साम्यवादी मंडळी भांडवलशाहीला कडवा विरोध करतात. लोकशाही, समता, व्यक्तिस्वातंत्र्य, टीकास्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य मानणाऱ्या मंडळींचा फॅसिस्टांना राग येतो. कारण फॅसिस्ट मंडळी समता, लोकशाही, शांतता, सनदशीरता ही मूल्ये मानत नाहीत. या परस्परविरोधी विचारधारा आपापल्या मूल्यांच्या बाबतीत इतक्या कडव्या का बनतात हे त्या-त्या विचारसरणींच्या हितसंबंधात्मक टकरावाच्या संदर्भात समजावून घ्यावे लागते. विशिष्ट मूल्यांचा आग्रह आणि श्रद्धांच्या पुरस्काराबरोबरच प्रत्येक विचारसरणी ही माणसाला जीवनदृष्टी व विश्वदृष्टी देत असते. या जीवनदृष्टी व विश्वदृष्टीमुळे माणसाला त्याचे जीवन अर्थपूर्ण वाटू लागते. आपल्या अस्तित्वाला, जगण्याला काही प्रयोजन आहे असा विश्वास त्याला वाटू लागतो. शोषणमुक्त, समतेवर आधारित समाजनिर्मितीसाठी मी जगत आहे आणि तेच माझ्या जीवनाचे प्रयोजन आहे असे साम्यवाद्यांना वाटते. हिदू जीवनमार्ग हा आदर्श व परिपूर्ण मार्ग आहे आणि म्हणून हिदू संघटनांसाठी व हिदुत्वाच्या मूल्यासाठी मी जगतोय ही हिदुत्ववाद्याची धारणा बनते व तो त्यासाठी काहीही करायला तयार होतो. जातिजन्य शोषण व अन्यायाच्या विरोधात फुले-आंबेडकरवादी उभे राहतात, तर भौतिक विकासाच्या अतिरेकी ध्यासाने निसर्गालाच ओरबडायला निघालेल्या मुख्यप्रवाही विकासवाद्यांच्या विरोधात पर्यावरणवादी संघर्ष करतात. पुरुषसत्तेच्या सर्वंकष नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी स्त्रीवाद उभा राहतो, तर राज्यसंस्थेच्या सर्वंकष दमन आणि हिसेच्या विरोधात 'अराज्यवाद' उभा राहतो. हे उभे राहणे म्हणजे जीवनाला प्रयोजन प्राप्त होणे असते. जगण्याला प्रयोजन असणे म्हणजे जगणे अर्थपूर्ण होणे. जगणे अर्थपूर्ण होणे ही विचारक्षम व समृद्ध भावजीवनाची आस असलेल्या माणसाची बौद्धिक, भावनिक आणि हितसंबंधात्मक गरज असते. माणसाची ही गरज विचारसरणीमुळे बऱ्याच अंशी भागली जाते म्हणून माणसे विचारसरणीकडे आकृष्ट होतात. किबहुना जितक्या प्रमाणात एखादी विचारसरणी माणसाच्या या त्तिविध गरजा भागवू शकते तितक्या प्रमाणात ती अधिक शाश्वत व वर्धिष्णू बनते. या गरजांची पूर्तता करण्याची विचारसरणीची क्षमता संपली की विचारसरणी अप्रस्तुत कालबाह्य होऊ लागतात. श्रद्धा, मूल्ये व जीवनदृष्टीबरोबरच प्रत्येक विचारसरणी ही प्रस्थापित व्यवस्थेतील अपूर्णता सांगत असते. दोष दाखवित असते आणि ही अपूर्णता, दोष संपवून नवी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, असेही सांगते. म्हणजेच विचारसरणी ही माणसाला एक 'युरोपिया' ध्येयस्वप्न देत असते. माणसाला बदल हवे असतात. कोणतीही व्यवस्था कधीच परिपूर्ण नसते. परिणामत: व्यवस्थेतील न्यून समजावून दिले की माणसांना त्या विचारसरणीबद्दल आदर वाटू लागतो. विचारसरणी नुसतेच दोष दिग्दर्शन करीत नाही, तर त्यावर इलाजही सुचवते. समाज बदलांचे राजकीय कार्यक्रम देते व माणसाला कृतिप्रवण बनवते. त्यामुळे एकाच वेळी विचारसरणी ही वास्तवाचे विश्लेषण करत माणसाची बौद्धिक भूक भागवते तसेच ती माणसाला ठोस कार्यक्रम देऊन कृतीला, राजकीय हस्तक्षेपाला सिद्धही करत असते. माणसाला नुसती चर्चा, चिकित्सा, विचार-चर्चा नको असते; त्याबरोबर कृती व्हावी असे वाटत असते. विविध राजकीय, आर्थिक कार्यक्रमाद्वारा विचारसरणी माणसाची ही क्रियाशीलतेची गरज भागवते. म्हणूनच माणसाच्या समूहांना हलविण्याची जबरदस्त ताकद विचारसरणीत असते. माणसे विचारसरणींनी झपाटतात, कृतिशील होतात, संघर्षाला तयार होतात. त्यासाठी सर्वस्वाचा होम करण्याची त्याची तयारी असते. राजकीय हस्तक्षेपासाठी 'मास मोबिलायझेशन' करण्याची विचारसरणीची ही ताकद अभूतपूर्व असते. प्रश्न इतकाच असतो की ही ताकद माणूस समाजाची स्वतंत्रता, विवेकशीलता वाढावी, समतेवर आधारित व शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा म्हणून वापरतो, की सांप्रदायिक, जातीयवादी, भयग्रस्त धर्मांध समाज निर्माण व्हावा यासाठी वापरतो? विचारसरणीची इष्टानिष्टता, पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व, मुक्तिदायी आणि वैचारिक अंधत्व आणणणारे स्वरूप व आशय हा वरील निकषांवर ठरत असतो. त्यानुसार विचारसरणीचे स्थितीवादी, परिवर्तनवादी, पुरोगामी, प्रतिगामी, उजवी-डावी-मध्यममार्गी असे अनेक प्रकार संभवतात. आणखीही एक बाब नोंदवणे आवश्यक आहे व ती म्हणजे राजकारण्यांचे आपले आकलन व वाचन हे जसे प्राय: विचारसरणीमूलक असते तसेच एखाद्या विचारसरणीचे आपले आकलन हेही पुन्हा विचारसरणीमूलक (आयडिऑलाॅजिक) असू शकते. अशा विचारसरणीमूलक आकलनापलीकडे जाऊन विचारसरणीचे समाजशास्त्रीय आकलन कसे करून घ्यायचे याहीकडे आपण वळले पाहिजे. त्याविषयी क्रमश: बोलू. - प्रा. डॉ. यशवंत सुमंत |
Thursday, March 3, 2011
विचारसरणी म्हणजे तत्त्वज्ञान नव्हे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment