Thursday, March 3, 2011

विचारसरणीचे आकलन

ज्या राजकीय विचारसरणीच्या
संपर्कात आपण येतो
त्यानुसार आपली दृष्टी घडते.
आपापल्या दृष्टिकोनातून आपण
सगळ्या गोष्टींकडे पाहायला लागतो.
परिणामत: विचारसरणीचे
आपले आकलन नि:पक्षपाती असतेच असे नाही.



आपण सारेच जण आपल्या कळत न कळत कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारसरणीच्या विश्वात आणि संपर्कात कमी अधिक प्रमाणात येत असतो व त्यानुसार स्वत:कडे, समाजाकडे व विश्वाकडे पाहण्याची आपली दृष्टी घडते. विचारसरणीकडे पाहातानाही आपण बऱ्याचदा आपापल्या विचारसरणीमूलक दृष्टीने पाहू लागतो. परिणामत: विचारसरणीचे आपले आकलन नेहमीच तटस्थ, नि:पक्षपाती, पूर्वग्रहविरहित असते, असे नाही.
आपल्या मनाची जडणघडण उदारमतवादी संस्कारातून झाली असेल तर आपल्याला सर्वच विचारसरणी या 'बंदिस्त विचारधारा' वाटतात. कोणताही बंदिस्त विचार हा नेहमीच अंतिम सत्याचा दावा करीत असल्याने तो चिकित्सेला नकार देतो व आहे ते मत बिनशर्तपणे स्वीकारले पाहिजे, असा आग्रह धरतो. विचारसरणीही हेच करतात आणि म्हणूनच त्यांना अनुसरल्याने माणसाची विचारक्षमता क्षीण होते. उदारमतवाद हा मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, चिकित्सास्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य मानत असल्यामुळे तो 'बंदिस्त विचार' स्वीकारू शकत नाही. विचारसरणीच्या आहारी जाऊन माणसे जी ठोकळेबाज पद्धतीने विचार करतात ते उदारमतवाद्यांना पटत नाही. परिणामत: सगळ्याच विचारसरण्या एका अर्थी 'विचार-शत्रू' असतात म्हणून त्यांपासून शक्यतो दूर राहण्याकडे उदारमतवादाचा कल असतो.
या उलट पारंपरिक स्थितीवाद्यांना जसे वाटते की विचारसरणी ज्या आदर्श समाजाचे चित्र रंगवते तो एक भूलभुलय्याच असतो. प्रत्यक्षात असा समाज कधी अस्तित्वात येत नसतो. माणसे मूल्यांच्या, तत्त्वांच्या कितीही गप्पा मारत असली तरी प्रत्यक्षात ती अव्यवहारिपणे कधीच जगत नसतात. बहुतांशी माणसे आपापले अनुभव, कॉमनसेन्स, तरतमभाव, सतर्कता आणि आवश्यक ती सावधानता बाळगत धोरणीपणाने जगत असतात. या उलट विचारप्रणाली मात्र माणसांना अव्यवहार्य आदर्श सांगत वास्तवापासून दूर नेत असते. सबब विचारसरणीच्या नादी लागणे म्हणजे अव्यवहारी होणे असे परंपरानिष्ठ स्थितीवादी मंडळींना वाटते. समाजातील बदल हे हळूहळू क्रमश: होतच असतात. त्यात घिसाडघाईने, आहे त्या स्थिरावलेल्या व्यवस्थेची मोडतोड करणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देण्यासारखे आहे. असे परंपरानिष्ठ स्थितीवाद्यांना वाटते. आपल्यावर जर या परंपरानिष्ठ स्थितीवादाचा संस्कार झाला असेल तर आपणही विचारसरणीकडे याच दृष्टीने पाहात असतो.
माक्र्सवादी दृष्टिकोनातून पाहिले तर विचारसरणी हा एक भ्रममूलक विचार असतो. प्रस्थापित वर्गांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यकर्ता वर्ग तथाकथित वैश्विकतेचा दावा करणाऱ्या विचारधारा निर्माण करतो व तोच कसा त्या त्या काळचा युगधर्म आहे हे सांगतो. परिणामत: व्यवस्थेत असणारे विविध अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारे ताण व संघर्ष यावर पांघरुण घालण्याचे काम विचारप्रणाली करीत असते आणि म्हणूनच समाजव्यवस्थेत चालणारे दमण, शोषण हे सर्वसामान्य माणसाला अपरिहार्य आणि स्थानिकही वाटू लागते. माणसं आपल्या नकळत विचारसरणीच्या भ्रममूलक दृष्टीने सत्य मानून ती विचारसरणी आत्मसात करतात आणि आहे त्या व्यवस्थेला बिनशर्त मान्यता देतात. त्यामुळे राज्यकर्त्या वर्गाचे विचारसरणीच्या माध्यमातून समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम व आहे त्या व्यवस्थेला लोकमान्यता मिळविण्याचे काम सुकर होते, असे माक्र्स सांगतो. साहजिकच माक्र्सच्या म्हणण्यानुसार विचारसरणी ही कितीही वैश्विकतेचा व सार्वत्तिकतेचा दावा करीत असली तरी ती मुळातच राज्यकर्त्या वर्गाची पक्षपाती असते. ती संपूर्ण समाजवास्तवाचे दर्शन कधीच करीत नाही. उलट ती समाजवास्तवाचा विपर्यास करीत असते म्हणूनच ती शास्त्रीय नसते.
एक भ्रममूलक आणि वास्तवाचा विपर्यास करणारा विचार म्हणून माक्र्सने विचारसरणीची शास्त्रीयता जरी नाकारली असली तरी माक्र्सचे वैशिष्ट्य असे आहे की, असे 'भ्रममूलक विचार' समाजात कसे पसरतात, जनमानसाचा ते कसा ताबा घेतात, माणसे अशा विचारांच्या आहारी का जातात, अशा विचारांची पाळेमुळे समाजाच्या भौतिक वास्तवामध्ये कशी असतात हे त्याने समर्थपणे स्पष्ट केले. त्यामुळे विचारप्रणालींची केवळ बदनामी करत राजकीय प्रक्रियेतील त्यांचे अस्तित्व, सामर्थ्य माक्र्सने कधीच नाकारले नाही. परिणामत: परंपरानिष्ठ स्थितीवादी किवा व्यवहारवादी विचारसरणीकडे ज्या तुच्छतेने पाहातात तसा माक्र्सचा विचारसरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतावादी नाही. कोणत्या भौतिक वास्तवातून विचारसरणी निर्माण होते ते पाहिले पाहिजे, असे माक्र्स म्हणतो आणि हे भौतिक वास्तव समजल्याशिवाय विचारसरणीचे नेमके प्रयोजन काय, सामर्थ्य किती, प्रभाव किती, मूल्यदृष्टी काय हे काहीच समजत नाही, असे माक्र्स म्हणतो.
माक्र्सच्या याच दृष्टीचा विकास करीत इटलीमधील प्रसिद्ध माक्र्सवादी विचारवंत आंतोनिओ ग्रामशी याने विचारसरणीच्या माध्यमातून प्रत्यक्ष दमनाचा सतत वापर न करता राज्यकर्ता वर्ग समाजावर आपले संपूर्ण नियंत्रण व वर्चस्व कसे ठेवतो हे स्पष्ट केले. राज्यकर्त्या वर्गाचे हे वर्चस्व निर्विवादपणे स्थापन झाले की समाजही आपल्या सार्वजनिक जीवनाचे धुरिणत्व राज्यकर्त्या वर्गाला बहाल करतो. असे धुरिणत्व साध्य करताना राज्यकर्ता वर्ग आपल्या सत्तेला, ती टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या दमनाला, आपल्या हितसंबंधांचे संवर्धन करणाऱ्या धोरणांना लोकसंमतीही मिळवित असतो. हे सारे तो विचारप्रणालीच्या आधारे करीत असतो. एकदा ही विचारसरणी लोकांच्या गळी उतरवली की मग राज्यकर्त्या वर्गाला दमन, हिसा करण्याची गरज भासत नाही व समाजातील 'आहे रे' वर्गाचे हितसंबंध तो निर्वेधपणे जपू शकतो व तेच खरे 'सार्वजनिक हित' आहे, असेही सांगू शकतो. राज्यकर्त्या वर्गाच्या अशा विचारसरणीचा पगडा एकदा बसला की व्यवस्थेतील अपूर्णता, अन्याय, शोषण, अंतर्विरोध यावर आपोआपच पांघरूण घातले जाते. मग व्यवस्थेमध्ये जे 'नाही रे' वर्ग, लोकसमूह आहेत त्यांचा आवाजही दडपला जातो. ते निमूटपणे शोषण, हिंसा सहन करतात त्यांना जागे कसे करायचे, त्यांचे प्रश्न कसे मांडायचे, त्यांना अन्यायाच्या विरोधात संघर्ष करायला कसे सिद्ध करायचे हे प्रश्न उभे ठाकतात. व्यवस्थेतील पारंपरिक विचारवंतांचा वर्ग हा एका अर्थाने त्याच राज्यकर्त्या वर्गाचा भाग असल्याने एक तर राज्यकर्त्या वर्गाचा विचारसरणीचा तो वाहक तरी असतो वा गुलाम तरी असतो. अशा परिस्थितीत तो समाजव्यवस्थेतील 'नाही रे' वर्गाच्या बाजूने एक वर्ग म्हणून उभा राहील याची कोणतीच खात्री नसते. उलट राज्यकर्त्या वर्गाच्या विचारसरणीचे समर्थन करीत तो 'नाही रे' वर्गाचीच दिशाभूल करीत राहतो. ग्रामशीच्या मते अशा परिस्थितीत राज्यकर्त्या वर्गाच्या विचारसरणीशी टक्कर देण्यासाठी, त्यातील पक्षपात उघड करण्यासाठी खुद्द 'नाही रे' वर्गालाही त्यांच्या रास्त; पण दडपलेल्या हितसंबंधांच्या वतीने तर्कशुद्ध पद्धतीने बोलणाऱ्या व त्यांच्यातीलच एक झालेल्या विचारवंतांची गरज भासते. ग्रामशीने यालाच 'सेंद्रीय विचारवंत' (ऑरगॅनिक इंटेलेक्चुअल) म्हटले आहे. हे ऑरगॅनिक इंटलेक्चुअल्स राज्यकर्त्या वर्गाच्या प्रस्थापित विचारसरणीशी सामना करण्यासाठी 'नाही रे' वर्गाच्या बाजूने प्रतिविचारसणी (काउण्टर आयडिऑलॉजी) निर्माण करतात व राज्यकर्त्या वर्गाच्या वैचारिक धुरिणत्वाला आव्हान देत विद्रोही विचारधारा राबवतात, नाही रे वर्गाला मोबिलाईज करतात अशा प्रतिविचारसरणी निर्माण झाल्याशिवाय प्रस्थापित विचारसरणीचा पक्षपातीपणा उघडा पडत नाही. याच हेतूने श्रमिक वर्गाची/शोषित वर्गांची प्रतिविचारसरणी समाजात निर्माण होते व दडपलेल्या वर्गांच्या मुक्तीचे राजकारण सुरू होते. ग्रामशीला अभिप्रेत असलेल्या ऑरगॅनिक इंटेलेक्युअलचे भारतातील समर्पक व सर्वाधिक ठळक उदाहरण म्हणजे महात्मा जोतिबा फुले होत.
विचारसरणीकडे पाहाण्याचे हे काही महत्त्वाचे विविध दृष्टिकोन आहेत. त्यातील काही विचारसरणीमूलक आहेत तर काही विचारसरणीकडे पाहण्याचे शास्त्रीय दृष्टी विकसित करणारे आहेत. पण विचारसरणीकडे पाहाण्याची शास्त्रीय दृष्टिकोनाचेही जर विचारसरणीत रूपांतर झाले वा होऊ लागले तर काय करायचे-? म्हणून मग विचारसरणीकडे पाहण्याच्या शास्त्रीय दृष्टिकोनाबरोबरच विचारसरणीचे तटस्थ आकलन करणारे जे अन्य समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहेत त्याचाही परिचय होणे आवश्यक आहे. तिकडे आपण वळू यात.

( yashwantsuman@yahoo.com)

No comments:

Post a Comment