Thursday, March 3, 2011

परस्परविरोधी टोकांच्या मध्यावर...

एका बाजूला विकासाची उत्तुंग शिखरे तर दुसरीकडे विस्थापनाच्या दऱ्या.
एकीकडे विश्वबंधुत्वाची भाषा तर दुसरीकडे जातीय-धार्मिक-भाषिक विद्वेषाचे वणवे.
..भवताली असा सारा कोलाहल आणि राष्ट्र-राज्य व्यवस्थेपासून
कुटुंब संस्थेपर्यंत सर्वत्र उभी आव्हाने ! - यातले हताशपण अनुभवताना
आपले 'आकलन' जागे ठेवण्यासाठी मदतीला येतो तो सम्यक समतोल 'विचार'.
समकालीन विचारधारांची ओळख करून देणाऱ्या पाक्षिक लेखमालेचा हा प्रारंभ...

जागतिकीकरणाच्या पर्वात आपल्या जगण्याचे सारे संदर्भ झपाट्याने बदलत आहेत. औद्योगिक भांडवलशाहीकडून उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या वळणावर आज आपण येऊन पोचलो आहोत. औद्योगिक भांडवलशाहीने आधुनिक समाजाच्या धारणेसाठी ज्या सामाजिक/ राजकीय संस्था निर्माण केल्या त्या सर्वच संस्थांची उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या काळात एकतर कोंडी होत आहे किवा त्यांची अधिमान्यता नाहीशी होत आहे. मग ते आधुनिक राष्ट्र-राज्य असो वा प्रातिनिधिक शासन संस्था, नोकरशाही असो वा लष्कर, राजकीय पक्ष असोत वा सामाजिक संस्था, राष्ट्रीय शिक्षणव्यवस्था असो वा अर्थव्यवस्था! कुटुंब संस्थेपासून ते राष्ट्र-राज्य व्यवस्थेपर्यंत सर्वच संस्थांपुढे काही मूलभूत आव्हाने, क्वचित अरिष्टेही निर्माण झाली आहेत. संस्थात्मक जीवनात होणाऱ्या या स्थित्यंतराचा परिणाम माणसामाणसांतील नात्यांवरही होत आहे. स्त्री-पुरुष, पती-पत्नी, शिक्षक-विद्यार्थी, उत्पादक आणि ग्राहक, मालक-नोकर, नेता-अनुयायी, शासनकर्ते व नागरिक ही एकेकाळी स्थिर बांधीलकीवर आधारित, काहीशी शाश्वत वाटणारी नाती आता उत्तरोत्तर अस्थिर होत चालली आहेत. रूढ सामाजिक ओळखी पुसल्या जात आहेत. नव्या सामाजिक ओळखी तयार होत आहेत. त्या अनुषंगाने नव्या सामाजिक/राजकीय अस्मिताही साकारत आहेत.

तंत्रज्ञानात झालेल्या बदलाने आपले अर्थकारण, राजकारण, समाजकारण सारेच आमूलाग्र बदलत आहे. डावा-उजवा, प्रतिगामी-पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी-धर्मांधतावादी, उदामतवादी-कॉन्झर्व्हेटिव्ह, समाजवादी-भांडवलवादी ही सारी वर्णने एक तर पोकळ बनलेली आहेत किवा ती वेगळेच अर्थ घेऊन आपल्याला सामोरी येत आहेत. नवउदारमतवादाचे नाव घेत 'कॉन्झर्व्हेटिव्ह' विचार पुढे येत आहे. क्रांतीचे नाव घेत दहशतवाद पुढे सरसावतोय. रॅडिकॅलिझमचे नाव घेत मूलतत्त्ववाद फोफावत आहे.
जातिनिर्मूलनाची भाषा करत जातवाद वाढतो आहे. धार्मिकतेचा पेहराव घेऊन जमातवाद वाढतो आहे. एका बाजूला 'विचारसरणीच्या अंताची' भाषा बोलली जातेय, तर दुसरीकडे कोणी 'इतिहासाच्या अंताची' भाषा बोलत आहे.

समाजातील विविध आंतरविरोध तीव्र बनत पृष्ठभागावर येत आहेत. एका बाजूला विकासाची उत्तुंग शिखरे तर दुसऱ्या बाजूला विस्थापनाच्या दऱ्या. एका बाजूला विश्वबंधुत्वाची, विश्व नागरिकत्वाची भाषा तर दुसऱ्या बाजूला धार्मिक, जातीय व वांशिक विद्वेशाचा वणवा. एकीकडे स्त्रीमुक्तीची भाषा तर दुसरीकडे वाढता कौटुंबिक हिसाचार. एका बाजूला शोषित/वंचितांसाठी सामाजिक न्यायाची भाषा तर दुसऱ्या बाजूला दलितांवरील वाढते अत्याचार. या साऱ्या परस्परविरोधी प्रक्रिया पाहून सामान्य माणसाची मती कुंठीत झाली आहे. आपण विचार करू शकतो आणि समाजव्यवस्था विचाराच्या आधारे चालत असते यावरील त्याचा विश्वास उडत चालला आहे. परिणामत: तो एका बाजूला राजकारण व समाजकारणाबद्दल तुच्छतावादी होतोय, हताशपण अनुभवतोय तर दुसऱ्या बाजूला तो कर्मठ धर्मवादी किवा कर्मठ धर्मविरोधी बनतोय. कर्मठ स्त्रीवादी किवा कर्मठ पुरुष सत्तावादी बनतोय. कर्मठ विकासवादी किवा कर्मठ पर्यावरणवादी होतोय. कर्मठ जागतिकीकरणवादी किवा कर्मठ जागतिकीकरण-विरोधी बनतोय. या कर्मठवादाच्या आहारी गेल्याने खरे सत्य हे दोन परस्परविरोधी टोकांच्या मध्यावर असते हेच त्याला कळेनासे झाले आहे.

तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे समाज वास्तव समजून घेऊन त्यात सार्वजनिक हिताचा अवकाश शोधण्याची क्षमता तो गमावत चालला आहे. या कर्मठपणामुळेच मग सामाजिक भाष्याऐवजी शेरेबाजी सुरू होते. प्रामाणिक, विचारपूर्वक, आग्रही मत प्रतिपादनाऐवजी हेकटपणा व दुराग्रह येऊ लागतो. निकोप सामंजस्याऐवजी बाजारू तडजोडीला प्रतिष्ठा मिळते.

या आंतर्विरोधांनी ओतप्रोत भरलेल्या समाजवास्तवाचे नीट आकलन होण्यासाठी आपले वैचारिक गोंधळलेपण व कर्मठता संपली पाहिजे. ती संपल्याशिवाय कोणत्याही सामाजिक पेचांचे, प्रश्नांचे निराकरण होणार नाही. त्यासाठी गरज आहे ती आपल्या विचार-विश्वाला आशय देणाऱ्या विविध विचारसरणींच्या परिचयाची ! आपल्या तर्कबुद्धीला धारदार बनवणाऱ्या संकल्पनांची ! एक सुजाण नागरिक म्हणून तसेच शिक्षण, माध्यमे, पत्रकारिता, समाजकारण, उद्योग-व्यवसाय या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, शोषणमुक्ती, सामाजिक न्याय या वारंवार कानावर पडणाऱ्या संज्ञांचे नेमके अर्थ व संदर्भ समजलेच पाहिजेत. उदारमतवाद, राष्ट्रवाद, समाजवाद, भांडवलशाही, कॉन्झर्व्हेटिझम, आंतर्राष्ट्रवाद, गांधीवाद या सारख्या आधुनिक विचारधारांची तसेच स्त्रीवाद, पर्यावरणवाद, बहुसांस्कृतिकतावाद यासारख्या समकालीन विचारधारांची ओळख असायलाच हवी. तरच आपण काय आहोत व आपला सामाजिक व्यवहार कसा चालतो हे कळू शकेल. आपल्या अवतीभोवती चाललेल्या विविध सामाजिक आंदोलनांचा अजडा काय आहे, ते कोणत्या वर्गाच्या हितसंबंधांना प्राधान्य देतात, त्यांची वैचारिक ओळख काय आहे याची किमान माहिती असणे हे आपल्या सुसंस्कृततेचे लक्षण आहे असे आपण मानायला हवे. हे न झाल्यास पाठ आपल्याला कर्मठ धर्मवादी मंडळी सामाजिक नैतिकतेचे देऊ लागतील व जातिवादी शक्ती इतिहास लिहू लागतील. तसे होऊ लागले तर आपल्यात सुप्तरूपात असलेल्या जात-धर्म-वंशाच्या जाणिवा भस्मासुरासारख्या फोफावतील. यातून सुटका हवी असेल तर सामाजिक स्थित्यंतराचे विवेकनिष्ठ आकलन व्हायला हवे. त्यासाठी संकल्पनांच्या व विचारांच्या विश्वात आपल्याला प्रवेश करावा लागेल. तो आपल्या प्रबुद्ध होण्याचा, विवेकनिष्ठ होण्याचा आरंभ असेल. नववर्षासाठी हा संकल्प करू या?
(yashwantsumant06@yahoo.co.in )

No comments:

Post a Comment