Monday, July 4, 2011

भावनामय समाजवाद

भांडवलशाही व्यवस्थेला प्रतिसाद, प्रतिक्रिया आणि पर्याय अशा तिन्ही रूपात समाजवादी तत्त्वचिंतन आणि व्यवहार प्रगट होत गेला. परिणामत: समाजवादाचे विचारविश्व अनेक प्रकारांनी आणि अंत:प्रवाहाने जसे उत्तरोत्तर समृद्ध होत गेले तसेच ते गुंतागुंतीचे आणि अंतर्विरोधांनी जटीलही झाले. हा सारा गुंता नीट समजून घेतल्याशिवाय समाजवादाविषयी काही भाष्य करणे अथवा मत प्रदर्शन करणे हा एक प्रकारचा बौद्धिक उल्लूपणाच ठरेल. विशेषत: आजच्या समाजवादोत्तर जगाच्या कालखंडात अशा उल्लूगिरीला ऊत येणे स्वाभाविकच आहे. त्याकडे दुर्लक्ष करून समाजवादाचे बहुआयामी रूप जाणून घेतले पाहिजे तरच त्याची ताकद आणि र्मयादा नीट समजतील.

भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेने माणसाची उत्पादन शक्ती प्रचंड प्रमाणात वाढली. धननिर्मिती मोठय़ा प्रमाणात होऊ लागली. उत्पादनात वाढ होऊन भौतिक समृद्धीच्या वाटा मोकळ्या झाल्या. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणास गती आली; पण याचबरोबर भांडवलशाहीचे सामाजिक दुष्परिणामही स्पष्ट होऊ लागले. समृद्धी वाढली; पण ती मूठभर भांडवलदार वर्गाच्या हातात एकवटली गेली. शहरीकरणाबरोबर बकालीकरणही वाढले. यंत्रावर आधारित उत्पादनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. बेकारीची समस्या गंभीर होत गेली. कामगारांचे शोषण, दैन्य व दारिद्रय़ वाढतच गेले. या सार्‍या दुष्परिणामांमुळे युरोपीय समाजातील अनेक विचारी व संवेदनशील मंडळी अस्वस्थ झाली. भांडवलशाहीतून येणार्‍या या दुष्परिणामांवर काय उपाय असू शकतो याचा विचार सुरू झाला आणि यातून समाजवादी विचारांचा उदय झाला. या आरंभीच्या समाजवादी तत्त्वचिंतकांना ‘युरोपीयन सोश्ॉलिस्ट’ अर्थात आचार्य जावडेकरांच्या शब्दात ‘भावनामय समाजवादी’ म्हणून ओळखले जाते.

भावनामय समाजवाद हा समाजवादी विचारांचा आरंभ होता. ब्रिटन आणि फ्रान्समध्ये भावनामय समाजवादी विचार मांडले गेले. प्रख्यात अभिजात अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकाडरे याने वस्तूच्या मूल्याचा जो र्शमविषयक सिद्धांत सांगितला त्यानुसार वस्तूचे खरे मूल्य हे त्या वस्तूच्या निर्मितीमध्ये जेवढे मानवी र्शम खर्ची पडतात त्यावरूनच ठरत असते / ठरवले पाहिजे. याचाच अर्थ र्शमिकांच्या र्शमातून वस्तूची निर्मिती होत असेल, तर वस्तूची किंमत ठरविताना या र्शमाचा योग्य मोबदला र्शमिकाला मिळायला हवा. तो र्शमाचा वाटाच लक्षात न घेतल्यामुळे र्शमिकाची पिळवणूक होते आणि त्यातून सारे सामाजिक दुष्परिणाम सुरू होतात. म्हणून वस्तूचे मूल्य र्शमाच्या आधारे ठरत असते असे रिकाडरेने प्रतिपादिले; पण स्वत: डेव्हिड रिकाडरे हा मुक्त अर्थव्यवस्थावादी असल्यामुळे त्याने आपल्या र्शमाधारित मूल्यविषयक सिद्धांतातून निर्माण होणार्‍या कोणत्याही सामाजिक वा नैतिक तत्त्वांच्या विवरणाच्या फंदात तो पडला नाही; पण रिकाडरेच्या या सिद्धांताचा आधार घेत थॉमस हॉजस्किनसारख्या रिकाडरेवादी समाजवाद्याने असे प्रतिपादन केले की, भांडवलशाहीचे सगळे दुखणे हे वस्तूचे मूल्य ठरवताना र्शमिकांच्या र्शमाची दखल न घेण्यातून उद्भवते. र्शमिकांच्या र्शमामुळेच वस्तूला मूल्य प्राप्त होत असते. सबब या र्शमाची उपेक्षा करणे म्हणजेच कामगाराला त्याच्या र्शमाचा योग्य मोबदला न देणे होय. सार्‍या शोषणाचे मूळ हेच असल्याने भांडवलशाहीत कामगारांची पिळवणूक होते. त्यांना दैन्यावस्थेत ढकलले जाते आणि त्यांच्या र्शमाच्या जोरावर भांडवलदार मात्र सारा नफा कमावतो व गबर होत जातो. धननिर्मिती वाढते; पण धनाचा संचय भांडवलदार वर्गाच्या हाती एकटवतो आणि आर्थिक विषमता वाढते. आपल्या ‘लेबर डिफेन्डेड अगेन्स्ट दि क्लेम्स् ऑफ कॅपिटल’ (1825) या ग्रंथात थॉमस हॉजस्किन याने असे प्रतिपादिले की भांडवलदार वर्गाच्या हाती हे जे संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे त्याला आळा घालण्यासाठी संपत्तीचे प्रागतिक तत्त्वावर मोठय़ा प्रमाणात पुनर्वाटप अशा लोकात व्हायला हवे की जे धननिर्मितीत आपले र्शम खर्ची करतात. हॉजस्किन यांच्या मते कामगार आपल्या संघशक्तीच्या बळावर हे संपत्तीच्या पुनर्वाटपाचे उद्दिष्ट साध्य करू शकतील. सबब त्यांनी कामगार संघटनांच्या माध्यमातून आपली र्शमशक्ती संघटित करावी. हॉजस्किन यांनी असेही निक्षून सांगितले की, उत्पादक र्शम करणार्‍या कामगारांनी, उत्पादक र्शम न करता त्याचे लाभ घेणार्‍या मध्यमवर्गापासून कटाक्षाने दूर रहावे. कामगारवर्ग जितका स्वतंत्र आणि आत्मनिर्भर होईल तितका तो प्रभावी होईल. हॉजस्किनच्या या मतांचा फार मोठा परिणाम त्यावेळी झाला नाही पण रिकाडरेच्या र्शमविषय सिद्धांतातून र्शमाला केंद्रस्थानी महत्त्व देणार्‍या ‘र्शमवादाचा’ (लेबरिझम) जो नैतिक विचार सांगितला त्यातून समाजवादी नैतिकतेचा पाया घातला गेला. हॉजस्किन, अर्थातच, भांडवलशाही व्यवस्थेच्या अंताची भाषा करीत नव्हता. भांडवलशाही व्यवस्थेच्या चौकटीतच र्शमिकांना आर्थिक न्याय कसा मिळेल यावर त्याचा अधिक रोख होता. त्याच्या मते ‘भांडवलशाही’ नव्हे तर भांडवलदाराची नियत सुधारली पाहिजे. भांडवलदार दुष्टाव्याने वागतो. तो सुधारला की भांडवलशाहीचे दुष्परिणाम थांबतील, असे हॉजस्किनचे म्हणणे होते; पण मुळात भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेची संरचनाच अशी असते की, भांडवलदाराला नफेखोरी केल्यावाचून गत्यंतरच नसते हा विचार त्याकाळी स्पष्ट झाला नव्हता. म्हणूनच मार्क्‍सने या ‘रिकाडरेवादी समाजवाद्यांना’ ‘युरोपियन’ अर्थात स्वप्नाळू समाजवादी म्हटले.



- प्रा. डॉ. यशवंत सुमंत

Thursday, March 3, 2011

विचारसरणीचे आकलन

ज्या राजकीय विचारसरणीच्या
संपर्कात आपण येतो
त्यानुसार आपली दृष्टी घडते.
आपापल्या दृष्टिकोनातून आपण
सगळ्या गोष्टींकडे पाहायला लागतो.
परिणामत: विचारसरणीचे
आपले आकलन नि:पक्षपाती असतेच असे नाही.



आपण सारेच जण आपल्या कळत न कळत कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारसरणीच्या विश्वात आणि संपर्कात कमी अधिक प्रमाणात येत असतो व त्यानुसार स्वत:कडे, समाजाकडे व विश्वाकडे पाहण्याची आपली दृष्टी घडते. विचारसरणीकडे पाहातानाही आपण बऱ्याचदा आपापल्या विचारसरणीमूलक दृष्टीने पाहू लागतो. परिणामत: विचारसरणीचे आपले आकलन नेहमीच तटस्थ, नि:पक्षपाती, पूर्वग्रहविरहित असते, असे नाही.
आपल्या मनाची जडणघडण उदारमतवादी संस्कारातून झाली असेल तर आपल्याला सर्वच विचारसरणी या 'बंदिस्त विचारधारा' वाटतात. कोणताही बंदिस्त विचार हा नेहमीच अंतिम सत्याचा दावा करीत असल्याने तो चिकित्सेला नकार देतो व आहे ते मत बिनशर्तपणे स्वीकारले पाहिजे, असा आग्रह धरतो. विचारसरणीही हेच करतात आणि म्हणूनच त्यांना अनुसरल्याने माणसाची विचारक्षमता क्षीण होते. उदारमतवाद हा मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, चिकित्सास्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य मानत असल्यामुळे तो 'बंदिस्त विचार' स्वीकारू शकत नाही. विचारसरणीच्या आहारी जाऊन माणसे जी ठोकळेबाज पद्धतीने विचार करतात ते उदारमतवाद्यांना पटत नाही. परिणामत: सगळ्याच विचारसरण्या एका अर्थी 'विचार-शत्रू' असतात म्हणून त्यांपासून शक्यतो दूर राहण्याकडे उदारमतवादाचा कल असतो.
या उलट पारंपरिक स्थितीवाद्यांना जसे वाटते की विचारसरणी ज्या आदर्श समाजाचे चित्र रंगवते तो एक भूलभुलय्याच असतो. प्रत्यक्षात असा समाज कधी अस्तित्वात येत नसतो. माणसे मूल्यांच्या, तत्त्वांच्या कितीही गप्पा मारत असली तरी प्रत्यक्षात ती अव्यवहारिपणे कधीच जगत नसतात. बहुतांशी माणसे आपापले अनुभव, कॉमनसेन्स, तरतमभाव, सतर्कता आणि आवश्यक ती सावधानता बाळगत धोरणीपणाने जगत असतात. या उलट विचारप्रणाली मात्र माणसांना अव्यवहार्य आदर्श सांगत वास्तवापासून दूर नेत असते. सबब विचारसरणीच्या नादी लागणे म्हणजे अव्यवहारी होणे असे परंपरानिष्ठ स्थितीवादी मंडळींना वाटते. समाजातील बदल हे हळूहळू क्रमश: होतच असतात. त्यात घिसाडघाईने, आहे त्या स्थिरावलेल्या व्यवस्थेची मोडतोड करणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देण्यासारखे आहे. असे परंपरानिष्ठ स्थितीवाद्यांना वाटते. आपल्यावर जर या परंपरानिष्ठ स्थितीवादाचा संस्कार झाला असेल तर आपणही विचारसरणीकडे याच दृष्टीने पाहात असतो.
माक्र्सवादी दृष्टिकोनातून पाहिले तर विचारसरणी हा एक भ्रममूलक विचार असतो. प्रस्थापित वर्गांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यकर्ता वर्ग तथाकथित वैश्विकतेचा दावा करणाऱ्या विचारधारा निर्माण करतो व तोच कसा त्या त्या काळचा युगधर्म आहे हे सांगतो. परिणामत: व्यवस्थेत असणारे विविध अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारे ताण व संघर्ष यावर पांघरुण घालण्याचे काम विचारप्रणाली करीत असते आणि म्हणूनच समाजव्यवस्थेत चालणारे दमण, शोषण हे सर्वसामान्य माणसाला अपरिहार्य आणि स्थानिकही वाटू लागते. माणसं आपल्या नकळत विचारसरणीच्या भ्रममूलक दृष्टीने सत्य मानून ती विचारसरणी आत्मसात करतात आणि आहे त्या व्यवस्थेला बिनशर्त मान्यता देतात. त्यामुळे राज्यकर्त्या वर्गाचे विचारसरणीच्या माध्यमातून समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम व आहे त्या व्यवस्थेला लोकमान्यता मिळविण्याचे काम सुकर होते, असे माक्र्स सांगतो. साहजिकच माक्र्सच्या म्हणण्यानुसार विचारसरणी ही कितीही वैश्विकतेचा व सार्वत्तिकतेचा दावा करीत असली तरी ती मुळातच राज्यकर्त्या वर्गाची पक्षपाती असते. ती संपूर्ण समाजवास्तवाचे दर्शन कधीच करीत नाही. उलट ती समाजवास्तवाचा विपर्यास करीत असते म्हणूनच ती शास्त्रीय नसते.
एक भ्रममूलक आणि वास्तवाचा विपर्यास करणारा विचार म्हणून माक्र्सने विचारसरणीची शास्त्रीयता जरी नाकारली असली तरी माक्र्सचे वैशिष्ट्य असे आहे की, असे 'भ्रममूलक विचार' समाजात कसे पसरतात, जनमानसाचा ते कसा ताबा घेतात, माणसे अशा विचारांच्या आहारी का जातात, अशा विचारांची पाळेमुळे समाजाच्या भौतिक वास्तवामध्ये कशी असतात हे त्याने समर्थपणे स्पष्ट केले. त्यामुळे विचारप्रणालींची केवळ बदनामी करत राजकीय प्रक्रियेतील त्यांचे अस्तित्व, सामर्थ्य माक्र्सने कधीच नाकारले नाही. परिणामत: परंपरानिष्ठ स्थितीवादी किवा व्यवहारवादी विचारसरणीकडे ज्या तुच्छतेने पाहातात तसा माक्र्सचा विचारसरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतावादी नाही. कोणत्या भौतिक वास्तवातून विचारसरणी निर्माण होते ते पाहिले पाहिजे, असे माक्र्स म्हणतो आणि हे भौतिक वास्तव समजल्याशिवाय विचारसरणीचे नेमके प्रयोजन काय, सामर्थ्य किती, प्रभाव किती, मूल्यदृष्टी काय हे काहीच समजत नाही, असे माक्र्स म्हणतो.
माक्र्सच्या याच दृष्टीचा विकास करीत इटलीमधील प्रसिद्ध माक्र्सवादी विचारवंत आंतोनिओ ग्रामशी याने विचारसरणीच्या माध्यमातून प्रत्यक्ष दमनाचा सतत वापर न करता राज्यकर्ता वर्ग समाजावर आपले संपूर्ण नियंत्रण व वर्चस्व कसे ठेवतो हे स्पष्ट केले. राज्यकर्त्या वर्गाचे हे वर्चस्व निर्विवादपणे स्थापन झाले की समाजही आपल्या सार्वजनिक जीवनाचे धुरिणत्व राज्यकर्त्या वर्गाला बहाल करतो. असे धुरिणत्व साध्य करताना राज्यकर्ता वर्ग आपल्या सत्तेला, ती टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या दमनाला, आपल्या हितसंबंधांचे संवर्धन करणाऱ्या धोरणांना लोकसंमतीही मिळवित असतो. हे सारे तो विचारप्रणालीच्या आधारे करीत असतो. एकदा ही विचारसरणी लोकांच्या गळी उतरवली की मग राज्यकर्त्या वर्गाला दमन, हिसा करण्याची गरज भासत नाही व समाजातील 'आहे रे' वर्गाचे हितसंबंध तो निर्वेधपणे जपू शकतो व तेच खरे 'सार्वजनिक हित' आहे, असेही सांगू शकतो. राज्यकर्त्या वर्गाच्या अशा विचारसरणीचा पगडा एकदा बसला की व्यवस्थेतील अपूर्णता, अन्याय, शोषण, अंतर्विरोध यावर आपोआपच पांघरूण घातले जाते. मग व्यवस्थेमध्ये जे 'नाही रे' वर्ग, लोकसमूह आहेत त्यांचा आवाजही दडपला जातो. ते निमूटपणे शोषण, हिंसा सहन करतात त्यांना जागे कसे करायचे, त्यांचे प्रश्न कसे मांडायचे, त्यांना अन्यायाच्या विरोधात संघर्ष करायला कसे सिद्ध करायचे हे प्रश्न उभे ठाकतात. व्यवस्थेतील पारंपरिक विचारवंतांचा वर्ग हा एका अर्थाने त्याच राज्यकर्त्या वर्गाचा भाग असल्याने एक तर राज्यकर्त्या वर्गाचा विचारसरणीचा तो वाहक तरी असतो वा गुलाम तरी असतो. अशा परिस्थितीत तो समाजव्यवस्थेतील 'नाही रे' वर्गाच्या बाजूने एक वर्ग म्हणून उभा राहील याची कोणतीच खात्री नसते. उलट राज्यकर्त्या वर्गाच्या विचारसरणीचे समर्थन करीत तो 'नाही रे' वर्गाचीच दिशाभूल करीत राहतो. ग्रामशीच्या मते अशा परिस्थितीत राज्यकर्त्या वर्गाच्या विचारसरणीशी टक्कर देण्यासाठी, त्यातील पक्षपात उघड करण्यासाठी खुद्द 'नाही रे' वर्गालाही त्यांच्या रास्त; पण दडपलेल्या हितसंबंधांच्या वतीने तर्कशुद्ध पद्धतीने बोलणाऱ्या व त्यांच्यातीलच एक झालेल्या विचारवंतांची गरज भासते. ग्रामशीने यालाच 'सेंद्रीय विचारवंत' (ऑरगॅनिक इंटेलेक्चुअल) म्हटले आहे. हे ऑरगॅनिक इंटलेक्चुअल्स राज्यकर्त्या वर्गाच्या प्रस्थापित विचारसरणीशी सामना करण्यासाठी 'नाही रे' वर्गाच्या बाजूने प्रतिविचारसणी (काउण्टर आयडिऑलॉजी) निर्माण करतात व राज्यकर्त्या वर्गाच्या वैचारिक धुरिणत्वाला आव्हान देत विद्रोही विचारधारा राबवतात, नाही रे वर्गाला मोबिलाईज करतात अशा प्रतिविचारसरणी निर्माण झाल्याशिवाय प्रस्थापित विचारसरणीचा पक्षपातीपणा उघडा पडत नाही. याच हेतूने श्रमिक वर्गाची/शोषित वर्गांची प्रतिविचारसरणी समाजात निर्माण होते व दडपलेल्या वर्गांच्या मुक्तीचे राजकारण सुरू होते. ग्रामशीला अभिप्रेत असलेल्या ऑरगॅनिक इंटेलेक्युअलचे भारतातील समर्पक व सर्वाधिक ठळक उदाहरण म्हणजे महात्मा जोतिबा फुले होत.
विचारसरणीकडे पाहाण्याचे हे काही महत्त्वाचे विविध दृष्टिकोन आहेत. त्यातील काही विचारसरणीमूलक आहेत तर काही विचारसरणीकडे पाहण्याचे शास्त्रीय दृष्टी विकसित करणारे आहेत. पण विचारसरणीकडे पाहाण्याची शास्त्रीय दृष्टिकोनाचेही जर विचारसरणीत रूपांतर झाले वा होऊ लागले तर काय करायचे-? म्हणून मग विचारसरणीकडे पाहण्याच्या शास्त्रीय दृष्टिकोनाबरोबरच विचारसरणीचे तटस्थ आकलन करणारे जे अन्य समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहेत त्याचाही परिचय होणे आवश्यक आहे. तिकडे आपण वळू यात.

( yashwantsuman@yahoo.com)

विचारसरणी म्हणजे तत्त्वज्ञान नव्हे...


एखादी राजकीय विचारसरणी समजावून घेत असताना
तिच्या मूळ प्रेरणास्थानाशी ती किती इमान राखते हे पाहणे गरजेचे आहे.
विचारसरणी व सिद्धांत यातील फरकही समजून घेतला पाहिजे.


राजकीय विचारसरणी या कोणत्या ना कोणत्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या आधारे किवा राजकीय तत्त्वचितकाच्या चितनातून प्रेरित झालेल्या असल्या, तरी राजकीय विचारप्रणाली म्हणजे त्या राजकीय तत्त्ववेत्त्याचे समग्र तत्त्वज्ञान नव्हे हे प्रथम ध्यानात घ्यावे लागेल. म्हणूनच माक्र्सचे तत्त्वज्ञान आणि साम्यवाद यातील फरक समजून घ्यावाच लागतो. गांधींचे तत्त्वज्ञान आणि सर्वोदय यातील फरक समजून घ्यावाच लागतो. बहुजनवाद आणि फुले-आंबेडकरांचे राजकीय तत्त्वज्ञान यातील फरक ध्यानात घ्यावाच लागतो. साम्यवादाची प्रेरणा ही माक्र्सच्या विचारांची असली व त्याची समाजविश्लेषणाची स्थूल चौकट व परिभाषा माक्र्सची असली, तरी सर्वच 'साम्यवादी व्यवहार' माक्र्सच्या समग्र दर्शनाचा आविष्कार असतो असे नाही. तसेच बहुजन वादाची प्रेरणा फुले-आंबेडकरांचा विचार असला, तरी सर्वच बहुजनवादी फुले-आंबेडकरांचे समग्र तत्त्वज्ञान सांगतात/जगतात असे नव्हे. तसेच सगळेच सर्वोदयवादी मंडळी गांधी तत्त्वज्ञान जगतात असेही नाही. म्हणूनच एखादी राजकीय विचारसरणी समजावून घेत असताना तिच्या परिभाषेवरून तो नुसता समजून घेऊन चालणार नाही, तर तिच्या मूळ प्रेरणास्थानाशी ती किती इमान राखते हेही पाहावे लागते. म्हणूनच विचारसरणीची ओळख करून घेताना हळूहळू माणसाला त्या-त्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडेही वळावे लागते. पण हा झाला पुढचा टप्पा. पहिली बाब म्हणजे राजकीय विचारसरणी व राजकीय तत्त्वज्ञान/सिद्धांत यातील फरक समजला पाहिजे.
कोणतीही राजकीय विचारसरणी ही काही श्रद्धा व मूल्ये घेऊन उभी असते व तिच्या दृष्टीने या श्रद्धा व मूल्ये स्वयंसिद्ध असतात. त्यांना प्रश्नांकित करणे म्हणजे त्यांच्याप्रती असलेल्या निष्ठांबद्दल अश्रद्ध किवा संशयग्रस्त होणे होय आणि असा संशय घेणे हीच त्या विचारसरणीशी बेईमानी ठरते. राजकीय विचारसरणी अशा 'बेईमानदारांना' आपला विचारशत्रू मानते. म्हणूनच विशिष्ट राजकीय श्रद्धा व मूल्ये यांचा नि:संदिग्ध, आग्रही व निष्ठावान पुरस्कार करणे हे त्या-त्या विचारसरणीचे प्रमुख उद्दिष्ट असते. भांडवलशाहीवादी मंडळी समाजवाद/साम्यवादाला कडवा विरोध करतात, तर समाजाधिष्ठित समाज, शोषणमुक्त समाजाचे ध्येय स्वीकारलेली समाजवादी/ साम्यवादी मंडळी भांडवलशाहीला कडवा विरोध करतात. लोकशाही, समता, व्यक्तिस्वातंत्र्य, टीकास्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य मानणाऱ्या मंडळींचा फॅसिस्टांना राग येतो. कारण फॅसिस्ट मंडळी समता, लोकशाही, शांतता, सनदशीरता ही मूल्ये मानत नाहीत. या परस्परविरोधी विचारधारा आपापल्या मूल्यांच्या बाबतीत इतक्या कडव्या का बनतात हे त्या-त्या विचारसरणींच्या हितसंबंधात्मक टकरावाच्या संदर्भात समजावून घ्यावे लागते.
विशिष्ट मूल्यांचा आग्रह आणि श्रद्धांच्या पुरस्काराबरोबरच प्रत्येक विचारसरणी ही माणसाला जीवनदृष्टी व विश्वदृष्टी देत असते. या जीवनदृष्टी व विश्वदृष्टीमुळे माणसाला त्याचे जीवन अर्थपूर्ण वाटू लागते. आपल्या अस्तित्वाला, जगण्याला काही प्रयोजन आहे असा विश्वास त्याला वाटू लागतो. शोषणमुक्त, समतेवर आधारित समाजनिर्मितीसाठी मी जगत आहे आणि तेच माझ्या जीवनाचे प्रयोजन आहे असे साम्यवाद्यांना वाटते. हिदू जीवनमार्ग हा आदर्श व परिपूर्ण मार्ग आहे आणि म्हणून हिदू संघटनांसाठी व हिदुत्वाच्या मूल्यासाठी मी जगतोय ही हिदुत्ववाद्याची धारणा बनते व तो त्यासाठी काहीही करायला तयार होतो. जातिजन्य शोषण व अन्यायाच्या विरोधात फुले-आंबेडकरवादी उभे राहतात, तर भौतिक विकासाच्या अतिरेकी ध्यासाने निसर्गालाच ओरबडायला निघालेल्या मुख्यप्रवाही विकासवाद्यांच्या विरोधात पर्यावरणवादी संघर्ष करतात. पुरुषसत्तेच्या सर्वंकष नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी स्त्रीवाद उभा राहतो, तर राज्यसंस्थेच्या सर्वंकष दमन आणि हिसेच्या विरोधात 'अराज्यवाद' उभा राहतो. हे उभे राहणे म्हणजे जीवनाला प्रयोजन प्राप्त होणे असते. जगण्याला प्रयोजन असणे म्हणजे जगणे अर्थपूर्ण होणे. जगणे अर्थपूर्ण होणे ही विचारक्षम व समृद्ध भावजीवनाची आस असलेल्या माणसाची बौद्धिक, भावनिक आणि हितसंबंधात्मक गरज असते. माणसाची ही गरज विचारसरणीमुळे बऱ्याच अंशी भागली जाते म्हणून माणसे विचारसरणीकडे आकृष्ट होतात. किबहुना जितक्या प्रमाणात एखादी विचारसरणी माणसाच्या या त्तिविध गरजा भागवू शकते तितक्या प्रमाणात ती अधिक शाश्वत व वर्धिष्णू बनते. या गरजांची पूर्तता करण्याची विचारसरणीची क्षमता संपली की विचारसरणी अप्रस्तुत कालबाह्य होऊ लागतात.
श्रद्धा, मूल्ये व जीवनदृष्टीबरोबरच प्रत्येक विचारसरणी ही प्रस्थापित व्यवस्थेतील अपूर्णता सांगत असते. दोष दाखवित असते आणि ही अपूर्णता, दोष संपवून नवी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, असेही सांगते. म्हणजेच विचारसरणी ही माणसाला एक 'युरोपिया' ध्येयस्वप्न देत असते. माणसाला बदल हवे असतात. कोणतीही व्यवस्था कधीच परिपूर्ण नसते. परिणामत: व्यवस्थेतील न्यून समजावून दिले की माणसांना त्या विचारसरणीबद्दल आदर वाटू लागतो. विचारसरणी नुसतेच दोष दिग्दर्शन करीत नाही, तर त्यावर इलाजही सुचवते. समाज बदलांचे राजकीय कार्यक्रम देते व माणसाला कृतिप्रवण बनवते. त्यामुळे एकाच वेळी विचारसरणी ही वास्तवाचे विश्लेषण करत माणसाची बौद्धिक भूक भागवते तसेच ती माणसाला ठोस कार्यक्रम देऊन कृतीला, राजकीय हस्तक्षेपाला सिद्धही करत असते. माणसाला नुसती चर्चा, चिकित्सा, विचार-चर्चा नको असते; त्याबरोबर कृती व्हावी असे वाटत असते. विविध राजकीय, आर्थिक कार्यक्रमाद्वारा विचारसरणी माणसाची ही क्रियाशीलतेची गरज भागवते. म्हणूनच माणसाच्या समूहांना हलविण्याची जबरदस्त ताकद विचारसरणीत असते. माणसे विचारसरणींनी झपाटतात, कृतिशील होतात, संघर्षाला तयार होतात. त्यासाठी सर्वस्वाचा होम करण्याची त्याची तयारी असते. राजकीय हस्तक्षेपासाठी 'मास मोबिलायझेशन' करण्याची विचारसरणीची ही ताकद अभूतपूर्व असते. प्रश्न इतकाच असतो की ही ताकद माणूस समाजाची स्वतंत्रता, विवेकशीलता वाढावी, समतेवर आधारित व शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा म्हणून वापरतो, की सांप्रदायिक, जातीयवादी, भयग्रस्त धर्मांध समाज निर्माण व्हावा यासाठी वापरतो? विचारसरणीची इष्टानिष्टता, पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व, मुक्तिदायी आणि वैचारिक अंधत्व आणणणारे स्वरूप व आशय हा वरील निकषांवर ठरत असतो. त्यानुसार विचारसरणीचे स्थितीवादी, परिवर्तनवादी, पुरोगामी, प्रतिगामी, उजवी-डावी-मध्यममार्गी असे अनेक प्रकार संभवतात. आणखीही एक बाब नोंदवणे आवश्यक आहे व ती म्हणजे राजकारण्यांचे आपले आकलन व वाचन हे जसे प्राय: विचारसरणीमूलक असते तसेच एखाद्या विचारसरणीचे आपले आकलन हेही पुन्हा विचारसरणीमूलक (आयडिऑलाॅजिक) असू शकते. अशा विचारसरणीमूलक आकलनापलीकडे जाऊन विचारसरणीचे समाजशास्त्रीय आकलन कसे करून घ्यायचे याहीकडे आपण वळले पाहिजे. त्याविषयी क्रमश: बोलू.

- प्रा. डॉ. यशवंत सुमंत

प्रवास 'विचारसरणी'च्या प्रारंभाचा

युगारंभ

युरोपमधील पुनरुत्थानाच्या (रेनेसाँ) आणि प्रबोधनाच्या (एनलायटन्मेंट) चळवळीने युरोपातच नव्हे तर मानवी इतिहासात आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली. माणूस जन्मत: स्वतंत्र असतो आणि स्वतंत्रता हेच त्याचे सत्त्व आहे. सारी माणसे जन्मत: समान आहेत. माणूस हा प्राय: विचारक्षम (रॅशनल) आणि म्हणूनच विवेकक्षम प्राणी आहे ही प्रबोधनकाळाची मुख्य शिकवण होती. यातूनच स्वातंत्र्य, समता, विवेकवाद या मूल्यांचा उदय झाला. या मूल्यांमुळे माणसाची स्वत:कडे पहाण्याची, निसर्गाकडे आणि समाजाकडे पहाण्याची जीवनदृष्टीच बदलली. ही जीवनदृष्टी सरंजामशाहीकालीन पारंपरिक व मध्ययुगीन जीवनदृष्टीपेक्षा खूपच आगळीवेगळी होती. मध्ययुगीन, पारंपरिक समाजव्यवस्थांमध्ये समता हे मूल्य नव्हते. सारी मानवी नाती ही वरिष्ठ आणि कनिष्ठतेच्या तत्त्वावर आधारित होती. स्त्री-पुरुष, पती-पत्नी, गुरु-शिष्य, मालक-नोकर, जमीनदार-भूदास, राजा-प्रजा ही नाती बरोबरीच्या, समानतेच्या तत्त्वावर आधारित नव्हती. ती वरिष्ठांप्रतीच्या नि:सीम निष्ठेवर आधारित होती. काही माणसे जन्माने श्रेष्ठच असतात, जन्मजात गुणसंपन्न असतात आणि त्यांच्या धुरिणत्वाखाली सर्वसामान्यांनी आपले समाजजीवन जगण्यातच सर्वांचेच भले असते अशी पारंपरिक समाजाची धारणा होती. आजही स्वातंत्र्य, समता, बंधुता इ. प्रबोधनकालीन मूल्ये ज्या समाजघटकांपर्यंत पोहोचली नाहीत, अशा मंडळींना 'समता' अस्वाभाविक वाटते. स्वातंत्र्याचे मूल्य निरर्थक वाटते.
प्रबोधनकालीन मूल्यांनी माणसाच्या या पारंपरिक धारणांना छेद दिला. माणूस विचारक्षम असल्याने त्याला त्याचे हित-अहित समजू शकते म्हणूनच त्याला विचाराचे, निर्णयाचे, निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असा आग्रह प्रबोधनकालीन विचारवंतांनी, वैज्ञानिकांनी, तत्त्वचितकांनी धरला. या स्वातंत्र्याच्या आग्रहामुळेच समाजातील धर्मगुरु, राजा, सरंजामी वतनदार, सरदार वर्ग यांच्या निरंकुश सत्तेला हादरे बसले. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स या देशांत लोकसत्ताक क्रांत्या झाल्या. आपली समाजरचना, राजकीय संस्था व व्यवस्था माणूस स्वत:च्या संकल्पानुसार बनवू, घडवू शकतो हा विश्वास माणसात निर्माण झाला. निसर्ग हा नियमबद्ध असून, निसर्गाचे नियम समजू शकतात आणि ते मानवी बुद्धीच्या कक्षेत आहेत हे विज्ञानाने स्पष्ट केले. त्याच न्यायाने सामाजिक जीवनाची गतितत्त्वे, समाजव्यवस्थांची धारक तत्त्वे विचाराच्या सहाय्याने, निरीक्षणातून समजू शकतात याचाही साक्षात्कार माणसाला झाला. साहजिकच सर्व सामाजिक, राजकीय, संस्था या मानवनिर्मित असून, माणसानेच स्वत:च्या हितापोटी त्या निर्माण केल्या आहेत, त्यात बिघाड झाल्यास तो दूर करण्याची क्षमताही माणसात आहे, किबहुना एक विचारक्षम जीवमात्र म्हणून ती त्याची जबाबदारी आहे ही धारणा प्रबोधनाने माणसाच्या ठायी निर्माण केली. हाच तो प्रबोधनकालीन बुद्धिवाद.
हा बुद्धिप्रामाण्यवाद आधारभूत मानून सन १७९५ मध्ये अंतोनी दि त्रेसी या विख्यात विचारवंताने 'इन्स्तित्यूत दि फ्रान्स' ही संस्था विचार शास्त्राचा (सायन्स ऑफ आयडियाज) पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुरू केली व तो त्याचा प्रमुखही बनला. या विचार शास्त्राला दि त्रेसीने 'आयडिऑलाॅजी' असा शब्दप्रयोग वापरला. आयडिऑलाॅजीच्या सहाय्याने माणसाची विचार-प्रक्रिया कशी चालते हे समजू शकेल. मानवी मनात विचार, कल्पना कशा तयार होतात हे समजले तर मानवी वर्तनाचा व कृतीचा नेमका अर्थ समजेल, त्याविषयीचे खरे ज्ञान माणसाला प्राप्त होईल व या ज्ञानाच्या आधारेच माणूस आपल्याला हव्या असलेल्या समाज व्यवस्थांची निर्मिती सहज करू शकेल व त्यातून त्याचे समाजजीवन सुखकर होईल हा प्रबोधनकालीन आशावाद दि स्त्रेसीच्या आयडियालाॅजी च्या मुळाशी होता. नंतरच्या काळात आयडियालाॅजी या शब्दाला अगदीच वेगळा अर्थ प्राप्त झाला हा भाग वेगळा. फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यावर त्याच्या अधिकारशाहीमुळे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात सशक्तपणे निर्माण झालेल्या लोकशाहीच्या धारणा व बुद्धिप्रामाण्यवादास खीळ बसली. नेपोलियनने पद्धतशीरपणे अंतोनी दि त्रेसी व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रतिपादिलेल्या बुद्धिप्रामाण्याचा, विचार शास्त्राचा उपहास केला व अंतिमत: त्यांनी स्थापलेली इन्स्टिट्यूज दि फ्रान्स ही संस्थाही मोडीत काढली.
दि त्रेसीच्या मूळ कल्पनेप्रमाणे, विचार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी निर्माण झालेली आयडियॉलाॅजी प्राणीशास्त्राची ज्ञानशाखा म्हणून विकसित होण्याऐवजी ती राजकीय व्यवस्थेचे धारक तत्त्व आणि विश्वदर्शनाची चौकट म्हणून पुढे विकसित झाली. यातूनच आज ज्याला आपण 'राजकीय विचारप्रणाली' (आयडिऑलाॅजी) म्हणतो त्या राजकीय विचारसरणीचे युग अवतरले. 'राष्ट्रवाद', 'उदारमतवाद', 'व्यक्तिस्वातंत्र्यवाद', 'कॉन्झर्व्हेटिझम', 'समाजवाद', 'भांडवलवाद', 'अराज्यवाद', 'साम्यवाद', 'फॅसिझम' अशा कितीतरी विचारधारा परस्परांशी संघर्ष करीत, ऐकमेकांशी टकराव घेत निर्माण झाल्या व त्यांनी आपली राजकीय दृष्टी व जीवनदृष्टी घडविली.
आपल्याला जाणीव असो वा नसो; पण राजकीय व्यवस्थांचे, राजकारणाचे, समाजातील विविध वर्गांचे आणि घटकांचे आपले आकलन हेच मुळी राजकीय विचारसरणींनी निर्धारित होत असते. झालेले असते. दलित, आदिवासींना मिळणाऱ्या आरक्षणाबाबतची नाराजी व्यक्त करताना बरेच जण त्यांना 'सरकारी जावई' असे उपहासाने म्हणतात तेव्हा ते ब्राह्यण्यवादाची विचारसरणी बोलत असतात. हे त्यांना दरवेळेस समजतेच असे नाही. म्हणूनच 'आम्ही जातबित मानत नाही' असे म्हणतानाच व स्पर्शास्पर्शाच्या व्यवहारापुरती जात मुक्त झालेली मंडळी 'लग्ने शक्यतो जातीअंतर्गतच असलेली बरी', किवा 'आरक्षणाचे फारच स्त्रोत माजलंय बुआ' अशी परस्पर विरोधी भूमिका घेताना दिसतात. किवा अनेक दलित मंडळी सरसकट सर्व ब्राह्यणांना व उच्च जातींना 'मनुवादी' ठरवतात तेव्हा ते डॉ. आंबेडकरांच्या क्रांतदर्शी तत्त्वज्ञानापेक्षा आंबेडकरवादी विचारसरणीच बोलत असतात हेही त्यांना बऱ्याचदा समजत नसते. 'सारे मुसलमान दहशतवादी नसतात पण दहशतवादी असलेले सारे मुसलमानच असतात' असा एस.एम.एस. करणारी मंडळी हिदुत्वावादाचे वाहक असतात.
तात्पर्य काय तर आपली राजकीय मते, दृष्टीकोन, राजकारणाचे आकलन हे सारेच विचारसरणीमुलक (आयडॉलाॅजिकल) असते, इतकी राजकीय विचारसरणी आपल्या कळत न कळत आपल्या विचारांचा व जाणीवांचा ताबा घेत असते. म्हणूनच विविध विचारसरणींचा परिचय करून घेण्याआधी राजकीय विचारसरणी म्हणजे नेमके काय हे समजून घेणे आवश्यक आहे. तरच प्रत्येक विचारसणीची ताकद आणि मर्यादा समजू शकेल. तसेच विचारसरणीचे राजकारणातील व समाजकारणातील महत्त्व समजू शकेल. अन्यथा 'शेंडी राखणारे आणि घंटा वाजवणारे हिदुत्व आम्हाला नकोय' किवा 'आमचे एेंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' या विधानांचा अर्थबोध होणार नाही. तसेच 'बहुजनवाद ते सर्वजनवाद' हा राजकीय प्रवास समजणार नाही.
- प्रा. डॉ. यशवंत सुमंत
(yashwantsumant06&yahoo.com )

परस्परविरोधी टोकांच्या मध्यावर...

एका बाजूला विकासाची उत्तुंग शिखरे तर दुसरीकडे विस्थापनाच्या दऱ्या.
एकीकडे विश्वबंधुत्वाची भाषा तर दुसरीकडे जातीय-धार्मिक-भाषिक विद्वेषाचे वणवे.
..भवताली असा सारा कोलाहल आणि राष्ट्र-राज्य व्यवस्थेपासून
कुटुंब संस्थेपर्यंत सर्वत्र उभी आव्हाने ! - यातले हताशपण अनुभवताना
आपले 'आकलन' जागे ठेवण्यासाठी मदतीला येतो तो सम्यक समतोल 'विचार'.
समकालीन विचारधारांची ओळख करून देणाऱ्या पाक्षिक लेखमालेचा हा प्रारंभ...

जागतिकीकरणाच्या पर्वात आपल्या जगण्याचे सारे संदर्भ झपाट्याने बदलत आहेत. औद्योगिक भांडवलशाहीकडून उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या वळणावर आज आपण येऊन पोचलो आहोत. औद्योगिक भांडवलशाहीने आधुनिक समाजाच्या धारणेसाठी ज्या सामाजिक/ राजकीय संस्था निर्माण केल्या त्या सर्वच संस्थांची उत्तर औद्योगिक भांडवलशाहीच्या काळात एकतर कोंडी होत आहे किवा त्यांची अधिमान्यता नाहीशी होत आहे. मग ते आधुनिक राष्ट्र-राज्य असो वा प्रातिनिधिक शासन संस्था, नोकरशाही असो वा लष्कर, राजकीय पक्ष असोत वा सामाजिक संस्था, राष्ट्रीय शिक्षणव्यवस्था असो वा अर्थव्यवस्था! कुटुंब संस्थेपासून ते राष्ट्र-राज्य व्यवस्थेपर्यंत सर्वच संस्थांपुढे काही मूलभूत आव्हाने, क्वचित अरिष्टेही निर्माण झाली आहेत. संस्थात्मक जीवनात होणाऱ्या या स्थित्यंतराचा परिणाम माणसामाणसांतील नात्यांवरही होत आहे. स्त्री-पुरुष, पती-पत्नी, शिक्षक-विद्यार्थी, उत्पादक आणि ग्राहक, मालक-नोकर, नेता-अनुयायी, शासनकर्ते व नागरिक ही एकेकाळी स्थिर बांधीलकीवर आधारित, काहीशी शाश्वत वाटणारी नाती आता उत्तरोत्तर अस्थिर होत चालली आहेत. रूढ सामाजिक ओळखी पुसल्या जात आहेत. नव्या सामाजिक ओळखी तयार होत आहेत. त्या अनुषंगाने नव्या सामाजिक/राजकीय अस्मिताही साकारत आहेत.

तंत्रज्ञानात झालेल्या बदलाने आपले अर्थकारण, राजकारण, समाजकारण सारेच आमूलाग्र बदलत आहे. डावा-उजवा, प्रतिगामी-पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी-धर्मांधतावादी, उदामतवादी-कॉन्झर्व्हेटिव्ह, समाजवादी-भांडवलवादी ही सारी वर्णने एक तर पोकळ बनलेली आहेत किवा ती वेगळेच अर्थ घेऊन आपल्याला सामोरी येत आहेत. नवउदारमतवादाचे नाव घेत 'कॉन्झर्व्हेटिव्ह' विचार पुढे येत आहे. क्रांतीचे नाव घेत दहशतवाद पुढे सरसावतोय. रॅडिकॅलिझमचे नाव घेत मूलतत्त्ववाद फोफावत आहे.
जातिनिर्मूलनाची भाषा करत जातवाद वाढतो आहे. धार्मिकतेचा पेहराव घेऊन जमातवाद वाढतो आहे. एका बाजूला 'विचारसरणीच्या अंताची' भाषा बोलली जातेय, तर दुसरीकडे कोणी 'इतिहासाच्या अंताची' भाषा बोलत आहे.

समाजातील विविध आंतरविरोध तीव्र बनत पृष्ठभागावर येत आहेत. एका बाजूला विकासाची उत्तुंग शिखरे तर दुसऱ्या बाजूला विस्थापनाच्या दऱ्या. एका बाजूला विश्वबंधुत्वाची, विश्व नागरिकत्वाची भाषा तर दुसऱ्या बाजूला धार्मिक, जातीय व वांशिक विद्वेशाचा वणवा. एकीकडे स्त्रीमुक्तीची भाषा तर दुसरीकडे वाढता कौटुंबिक हिसाचार. एका बाजूला शोषित/वंचितांसाठी सामाजिक न्यायाची भाषा तर दुसऱ्या बाजूला दलितांवरील वाढते अत्याचार. या साऱ्या परस्परविरोधी प्रक्रिया पाहून सामान्य माणसाची मती कुंठीत झाली आहे. आपण विचार करू शकतो आणि समाजव्यवस्था विचाराच्या आधारे चालत असते यावरील त्याचा विश्वास उडत चालला आहे. परिणामत: तो एका बाजूला राजकारण व समाजकारणाबद्दल तुच्छतावादी होतोय, हताशपण अनुभवतोय तर दुसऱ्या बाजूला तो कर्मठ धर्मवादी किवा कर्मठ धर्मविरोधी बनतोय. कर्मठ स्त्रीवादी किवा कर्मठ पुरुष सत्तावादी बनतोय. कर्मठ विकासवादी किवा कर्मठ पर्यावरणवादी होतोय. कर्मठ जागतिकीकरणवादी किवा कर्मठ जागतिकीकरण-विरोधी बनतोय. या कर्मठवादाच्या आहारी गेल्याने खरे सत्य हे दोन परस्परविरोधी टोकांच्या मध्यावर असते हेच त्याला कळेनासे झाले आहे.

तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे समाज वास्तव समजून घेऊन त्यात सार्वजनिक हिताचा अवकाश शोधण्याची क्षमता तो गमावत चालला आहे. या कर्मठपणामुळेच मग सामाजिक भाष्याऐवजी शेरेबाजी सुरू होते. प्रामाणिक, विचारपूर्वक, आग्रही मत प्रतिपादनाऐवजी हेकटपणा व दुराग्रह येऊ लागतो. निकोप सामंजस्याऐवजी बाजारू तडजोडीला प्रतिष्ठा मिळते.

या आंतर्विरोधांनी ओतप्रोत भरलेल्या समाजवास्तवाचे नीट आकलन होण्यासाठी आपले वैचारिक गोंधळलेपण व कर्मठता संपली पाहिजे. ती संपल्याशिवाय कोणत्याही सामाजिक पेचांचे, प्रश्नांचे निराकरण होणार नाही. त्यासाठी गरज आहे ती आपल्या विचार-विश्वाला आशय देणाऱ्या विविध विचारसरणींच्या परिचयाची ! आपल्या तर्कबुद्धीला धारदार बनवणाऱ्या संकल्पनांची ! एक सुजाण नागरिक म्हणून तसेच शिक्षण, माध्यमे, पत्रकारिता, समाजकारण, उद्योग-व्यवसाय या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, शोषणमुक्ती, सामाजिक न्याय या वारंवार कानावर पडणाऱ्या संज्ञांचे नेमके अर्थ व संदर्भ समजलेच पाहिजेत. उदारमतवाद, राष्ट्रवाद, समाजवाद, भांडवलशाही, कॉन्झर्व्हेटिझम, आंतर्राष्ट्रवाद, गांधीवाद या सारख्या आधुनिक विचारधारांची तसेच स्त्रीवाद, पर्यावरणवाद, बहुसांस्कृतिकतावाद यासारख्या समकालीन विचारधारांची ओळख असायलाच हवी. तरच आपण काय आहोत व आपला सामाजिक व्यवहार कसा चालतो हे कळू शकेल. आपल्या अवतीभोवती चाललेल्या विविध सामाजिक आंदोलनांचा अजडा काय आहे, ते कोणत्या वर्गाच्या हितसंबंधांना प्राधान्य देतात, त्यांची वैचारिक ओळख काय आहे याची किमान माहिती असणे हे आपल्या सुसंस्कृततेचे लक्षण आहे असे आपण मानायला हवे. हे न झाल्यास पाठ आपल्याला कर्मठ धर्मवादी मंडळी सामाजिक नैतिकतेचे देऊ लागतील व जातिवादी शक्ती इतिहास लिहू लागतील. तसे होऊ लागले तर आपल्यात सुप्तरूपात असलेल्या जात-धर्म-वंशाच्या जाणिवा भस्मासुरासारख्या फोफावतील. यातून सुटका हवी असेल तर सामाजिक स्थित्यंतराचे विवेकनिष्ठ आकलन व्हायला हवे. त्यासाठी संकल्पनांच्या व विचारांच्या विश्वात आपल्याला प्रवेश करावा लागेल. तो आपल्या प्रबुद्ध होण्याचा, विवेकनिष्ठ होण्याचा आरंभ असेल. नववर्षासाठी हा संकल्प करू या?
(yashwantsumant06@yahoo.co.in )