भांडवलशाही व्यवस्थेला प्रतिसाद, प्रतिक्रिया आणि पर्याय अशा तिन्ही रूपात समाजवादी तत्त्वचिंतन आणि व्यवहार प्रगट होत गेला. परिणामत: समाजवादाचे विचारविश्व अनेक प्रकारांनी आणि अंत:प्रवाहाने जसे उत्तरोत्तर समृद्ध होत गेले तसेच ते गुंतागुंतीचे आणि अंतर्विरोधांनी जटीलही झाले. हा सारा गुंता नीट समजून घेतल्याशिवाय समाजवादाविषयी काही भाष्य करणे अथवा मत प्रदर्शन करणे हा एक प्रकारचा बौद्धिक उल्लूपणाच ठरेल. विशेषत: आजच्या समाजवादोत्तर जगाच्या कालखंडात अशा उल्लूगिरीला ऊत येणे स्वाभाविकच आहे. त्याकडे दुर्लक्ष करून समाजवादाचे बहुआयामी रूप जाणून घेतले पाहिजे तरच त्याची ताकद आणि र्मयादा नीट समजतील.
भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेने माणसाची उत्पादन शक्ती प्रचंड प्रमाणात वाढली. धननिर्मिती मोठय़ा प्रमाणात होऊ लागली. उत्पादनात वाढ होऊन भौतिक समृद्धीच्या वाटा मोकळ्या झाल्या. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणास गती आली; पण याचबरोबर भांडवलशाहीचे सामाजिक दुष्परिणामही स्पष्ट होऊ लागले. समृद्धी वाढली; पण ती मूठभर भांडवलदार वर्गाच्या हातात एकवटली गेली. शहरीकरणाबरोबर बकालीकरणही वाढले. यंत्रावर आधारित उत्पादनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. बेकारीची समस्या गंभीर होत गेली. कामगारांचे शोषण, दैन्य व दारिद्रय़ वाढतच गेले. या सार्या दुष्परिणामांमुळे युरोपीय समाजातील अनेक विचारी व संवेदनशील मंडळी अस्वस्थ झाली. भांडवलशाहीतून येणार्या या दुष्परिणामांवर काय उपाय असू शकतो याचा विचार सुरू झाला आणि यातून समाजवादी विचारांचा उदय झाला. या आरंभीच्या समाजवादी तत्त्वचिंतकांना ‘युरोपीयन सोश्ॉलिस्ट’ अर्थात आचार्य जावडेकरांच्या शब्दात ‘भावनामय समाजवादी’ म्हणून ओळखले जाते.
भावनामय समाजवाद हा समाजवादी विचारांचा आरंभ होता. ब्रिटन आणि फ्रान्समध्ये भावनामय समाजवादी विचार मांडले गेले. प्रख्यात अभिजात अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकाडरे याने वस्तूच्या मूल्याचा जो र्शमविषयक सिद्धांत सांगितला त्यानुसार वस्तूचे खरे मूल्य हे त्या वस्तूच्या निर्मितीमध्ये जेवढे मानवी र्शम खर्ची पडतात त्यावरूनच ठरत असते / ठरवले पाहिजे. याचाच अर्थ र्शमिकांच्या र्शमातून वस्तूची निर्मिती होत असेल, तर वस्तूची किंमत ठरविताना या र्शमाचा योग्य मोबदला र्शमिकाला मिळायला हवा. तो र्शमाचा वाटाच लक्षात न घेतल्यामुळे र्शमिकाची पिळवणूक होते आणि त्यातून सारे सामाजिक दुष्परिणाम सुरू होतात. म्हणून वस्तूचे मूल्य र्शमाच्या आधारे ठरत असते असे रिकाडरेने प्रतिपादिले; पण स्वत: डेव्हिड रिकाडरे हा मुक्त अर्थव्यवस्थावादी असल्यामुळे त्याने आपल्या र्शमाधारित मूल्यविषयक सिद्धांतातून निर्माण होणार्या कोणत्याही सामाजिक वा नैतिक तत्त्वांच्या विवरणाच्या फंदात तो पडला नाही; पण रिकाडरेच्या या सिद्धांताचा आधार घेत थॉमस हॉजस्किनसारख्या रिकाडरेवादी समाजवाद्याने असे प्रतिपादन केले की, भांडवलशाहीचे सगळे दुखणे हे वस्तूचे मूल्य ठरवताना र्शमिकांच्या र्शमाची दखल न घेण्यातून उद्भवते. र्शमिकांच्या र्शमामुळेच वस्तूला मूल्य प्राप्त होत असते. सबब या र्शमाची उपेक्षा करणे म्हणजेच कामगाराला त्याच्या र्शमाचा योग्य मोबदला न देणे होय. सार्या शोषणाचे मूळ हेच असल्याने भांडवलशाहीत कामगारांची पिळवणूक होते. त्यांना दैन्यावस्थेत ढकलले जाते आणि त्यांच्या र्शमाच्या जोरावर भांडवलदार मात्र सारा नफा कमावतो व गबर होत जातो. धननिर्मिती वाढते; पण धनाचा संचय भांडवलदार वर्गाच्या हाती एकटवतो आणि आर्थिक विषमता वाढते. आपल्या ‘लेबर डिफेन्डेड अगेन्स्ट दि क्लेम्स् ऑफ कॅपिटल’ (1825) या ग्रंथात थॉमस हॉजस्किन याने असे प्रतिपादिले की भांडवलदार वर्गाच्या हाती हे जे संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे त्याला आळा घालण्यासाठी संपत्तीचे प्रागतिक तत्त्वावर मोठय़ा प्रमाणात पुनर्वाटप अशा लोकात व्हायला हवे की जे धननिर्मितीत आपले र्शम खर्ची करतात. हॉजस्किन यांच्या मते कामगार आपल्या संघशक्तीच्या बळावर हे संपत्तीच्या पुनर्वाटपाचे उद्दिष्ट साध्य करू शकतील. सबब त्यांनी कामगार संघटनांच्या माध्यमातून आपली र्शमशक्ती संघटित करावी. हॉजस्किन यांनी असेही निक्षून सांगितले की, उत्पादक र्शम करणार्या कामगारांनी, उत्पादक र्शम न करता त्याचे लाभ घेणार्या मध्यमवर्गापासून कटाक्षाने दूर रहावे. कामगारवर्ग जितका स्वतंत्र आणि आत्मनिर्भर होईल तितका तो प्रभावी होईल. हॉजस्किनच्या या मतांचा फार मोठा परिणाम त्यावेळी झाला नाही पण रिकाडरेच्या र्शमविषय सिद्धांतातून र्शमाला केंद्रस्थानी महत्त्व देणार्या ‘र्शमवादाचा’ (लेबरिझम) जो नैतिक विचार सांगितला त्यातून समाजवादी नैतिकतेचा पाया घातला गेला. हॉजस्किन, अर्थातच, भांडवलशाही व्यवस्थेच्या अंताची भाषा करीत नव्हता. भांडवलशाही व्यवस्थेच्या चौकटीतच र्शमिकांना आर्थिक न्याय कसा मिळेल यावर त्याचा अधिक रोख होता. त्याच्या मते ‘भांडवलशाही’ नव्हे तर भांडवलदाराची नियत सुधारली पाहिजे. भांडवलदार दुष्टाव्याने वागतो. तो सुधारला की भांडवलशाहीचे दुष्परिणाम थांबतील, असे हॉजस्किनचे म्हणणे होते; पण मुळात भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेची संरचनाच अशी असते की, भांडवलदाराला नफेखोरी केल्यावाचून गत्यंतरच नसते हा विचार त्याकाळी स्पष्ट झाला नव्हता. म्हणूनच मार्क्सने या ‘रिकाडरेवादी समाजवाद्यांना’ ‘युरोपियन’ अर्थात स्वप्नाळू समाजवादी म्हटले.
- प्रा. डॉ. यशवंत सुमंत